प्रत्येक राजघराण्याला कुणीतरी एक आचार्य असे. राजवंशातील मुले त्यांच्याकडेच धर्म, अर्थ आणि सामरीक शिक्षण घेत. सामान्य किंवा कनिष्ठ वर्गातील मुलांना यांच्या गुरुकुलात परवानगी नसे. द्रोणाचार्यांना कर्णाचे धनुर्विद्येतील विलक्षण कौशल्य माहिती होते, तरीही केवळ सूतपुत्र आहे म्हणून त्याला आपल्याकडे शिक्षण देण्यास त्यांनी मनाई केली. प्रचलित आणि कुण्या विद्वान गुरूंकडून विद्या मिळवायची म्हणजे मुलगा राजकुळाचा किंवा शाही घराण्याचा वंशज असायला पाहिजे असा रिवाज होता. म्हणजेच त्यावेळेसही शिक्षणाचे branding होत होते असं दिसत. आणि शिक्षण घेण्याची पात्रता कोणत्या कुळात जन्म झालेला आहे त्यावर अवलंबून होती. तथापि गुरुकुल चालवणे हा काही व्यवसाय नव्हता. आणि तत्कालीन शिक्षकांना पैशाचे महत्व नव्हते.
राजघराण्याव्यतिरिक्त ईतर मुलांनाही शिक्षण मिळायचे. प्राथमिक शिक्षण आणि वाडवडिलांकडून चालून आलेला व्यवसायाचे प्रशिक्षण बहुदा घरीच होई. विशेषाध्यायन किंवा उच्चशिक्षणासाठी गुरुकुलाचा पर्याय असे. चातुर्वर्ण्य पद्धतीनुसार ब्राह्मणांना वेदांचे, क्षत्रियांना युद्धशिक्षण आणि वैश्यांना व्यापार आणि अर्थशास्त्राचे धडे दिले जाई. शूद्रांना शिक्षण घेण्यास बहुदा मनाई होती. तेव्हाचे गुरु नगराजवळ असलेल्या वनात आश्रमात शिक्षण संकुल बनवायचे. त्यामागे एकांतात आणि पवित्र वातावरणात विद्योपार्जन व्हावे हा हेतू होता. विद्यार्थी त्याच्या आचार्यांच्या देखरेखीखाली वावरत आणि शिक्षण घेत. मध्यकालीन भारतात (गुप्तकाळ) तक्षशीला, नालंदा यांसारखी जगप्रसिद्ध विद्यापीठे होऊन गेली. नालंदा विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी केवळ भारतातूनच नव्हे, तर कोरिया, जपान, चीन, पर्शिया आणि तुर्की या देशामधून विद्यार्थी येत.
ब्रिटिशांनी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी शाळा हि संकल्पना भारतात आणली. त्यानंतर भारतीय शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल झाले. काही बदल चांगले आणि काही वाईटसुद्धा होते. सर्वांना समान शिक्षण दिले जाऊ लागले. पण निकोप आणि सर्वांगीण शिक्षण देणारी गुरुकुल शिक्षणव्यवस्था कालबाह्य झाली आणि शाळा ही नोकरदार वर्ग बनवणारी शिक्षणव्यवस्था बनली.